वाघामुळेच शिवसेना आमदार अडचणीत; गळ्यातील लॉकेटचा किस्सा भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:49 AM2024-02-25T11:49:45+5:302024-02-25T12:01:28+5:30
शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात एका प्रश्नावर उत्तर देताना, आमदार गायकवाड यांनी आपण ८० च्या दशकात वाघाची शिकार केली असल्याचे सांगितले.
बुलढाणा - आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अशाच एका विधानामुळे अडचणीत आले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेटचा किस्सा मोठ्या उत्साहाने व रंजकतेने सांगितला. मात्र, याच किस्स्यामुळे ते संकटात आले असून त्यांचं सोन्याचं लॉकेटही जप्त करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार गायकवाड यांनी सत्तेतील एका मंत्र्यांविरुद्ध विधान केल्यामुळे ते चांगलेच चर्चेत होते. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा, असे गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आता वाघाच्या विधानावरुन ते अडचणीत आले आहेत.
शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात एका प्रश्नावर उत्तर देताना, आमदार गायकवाड यांनी आपण ८० च्या दशकात वाघाची शिकार केली असल्याचे सांगितले. त्यानंतर, त्या वाघाचा दात काढून मी तो माझ्या गळ्यात लॉकेट म्हणून घालत असल्याचा दावा गायकवाड यांनी केला होता. ''सन १९८७ मध्ये मी वाघाची शिकार केली होती. त्याच वाघाच्या दाताचं हे लॉकेट आहे. तसेच, बिबट्या-फिबट्या तर मी असं पळवायचं, तेव्हा वाघाची शिकार केली होती, असा पुनरुच्चारही गायकवाड यांनी केला होता. त्यानंतर, संबंधित प्रदेशातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या या विधानाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. आमदार गायकवाड यांच्याकडील वाघाचा दात जप्त करण्यात आला असून वैद्यकीय तपासणीसाठी डेहरादून येथील संशोधन केंद्रात पाठवण्यात आला आहे. आता, या केंद्रातील अहवाल आल्यानंतरच गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की त्यांना दिलासा मिळणार हे स्पष्ट होईल.
सरकारलाही ठोकून काढू शकतो - गायकवाड
धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे सरकारविरोधातच वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी सरकार म्हणून सरकारची कधीच पर्वा करत नाही. मी सरकारच्या मंत्र्यांनाही ठोकून काढतो, सरकारला ही ठोकून काढू शकतो, असे वक्तव्य गायकवाड यांनी केले होते. तसेच, संविधानात बदल करणाऱ्यांनाही त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला. ज्या संविधानात ३६ क्रमांकावर आरक्षण दिलेले आहे. कोण्या ह***** केले आहे, तेवढे आम्हाला बदलून द्या. बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने का होईना तुमची बाजू सक्षम पणे मांडेल. आपल्यातलाच कार्यकर्ता म्हणून मांडेन, असे गायकवाड म्हणाले होते.