आरेतील आगीची सीआयडीमार्फत चौकशी करा; आ. सुनिल प्रभूंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 09:59 PM2018-12-05T21:59:29+5:302018-12-05T22:02:07+5:30
चौकशीच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या आगीची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदार सुनिल प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सोमवारी सायंकाळी आरे कॉलनीतील जंगलाला आग लागली. मात्र ही आग लागली की लावली, असा प्रश्न पर्यावरणरक्षकांसह अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी केली जावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.
मुंबई शहरात आणि उपनगरात सातत्याने आगीच्या घटना घडत असताना सोमवारी संध्याकाळच्या सुमारास गोरेगाव (पू) येथील आरे कॉलनीतील डोंगरावरील जंगलाला भीषण आग लागली. येथील वृक्ष व सुक्या गवताने पेट घेतल्याने आगीचा भडका ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पसरला. आग “लेव्हल-३” ची असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. या आगीमुळे दुर्मिळ झाडांसह वन्य प्राणी जीवांचीदेखील मोठी हानी झाली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनीच्या लगत असणा-या खासगी भूखंडावर आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे ही आग नैसर्गिकरित्या लागली की स्थानिक जमीन मालकांद्वारे समाज कंटकांमार्फत लावण्यात आली, याबाबत स्थानिक नागरिक आणि वन प्रेमींच्या मनात संशय आहे. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारच्या चौकशी यंत्रणेमार्फत करणे आवश्यक असल्याची मागणी प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.