Join us

'आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं वाईट वाटू लागलं'; सुनिल प्रभूंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 2:06 PM

शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार सुनिल प्रभू यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका केली. 

मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. 

शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मतं मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या अभिनंदनाच्या प्रस्तावावेळी शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार सुनिल प्रभू यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका केली. 

'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!

शिवसेना प्रतोद सुनील प्रभू म्हणाले, सदनात आमचा व्हिप जुगारुन ३९ सदस्यांनी विरोधात मतदान करत लोकशाहीची पायमल्ली केली हे इतिहास विसरणार नाही. ही खंत १३ कोटी जनतेच्या मनात असेल असं सांगत सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच १०-१५ दिवसांपूर्वी सत्तेचे वारे वाहू लागले तुम्ही कायदेमंत्री व्हाल असं वाटलं होतं. या राज्यात काहीही घडू शकतं. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो ते उपमुख्यमंत्री झाले. आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं दु:ख वाटू लागलं, असं सुनील प्रभू म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतोद म्हणून नेमलेले भरत गोगावले यांनी भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप काढला होता. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी पक्षादेश काढला. त्यामुळे नेमका व्हिप कुणाचा? यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष झाल्याचं मतदानापूर्वी पाहायला मिळत होते. 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३९ तर ठाकरे गटात १६ आमदार होते. शिंदे गटातर्फे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी राहुल नार्वेकर यांना मतदानाचा व्हिप काढला तर ठाकरे गटातर्फे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी साळवी यांना मतदान करण्याचा व्हिप जारी केला होता. राष्ट्रवादी व काँग्रेसने साळवी यांना, तर भाजपने नार्वेकर यांना मत देण्याचा व्हिप काढला होता.

पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली- मुख्यमंत्री

आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससुनील प्रभूशिवसेनाभाजपा