Join us

'नितेश राणेंनी सोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं', शिवसेना आमदार वैभव नाईक यांचं प्रतिआव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 1:37 PM

Nitesh Rane Vs Shiv Sena: शिवसेनेला आव्हान देणाऱ्या नितेश राणे यांनी त्यांच्यासोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं, असं प्रतिआव्हान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

मुंबई - राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा केलेला प्रयत्न, त्यानंतर शिवसैनिकांनी केलेलं आक्रमक आंदोलन, रात्री भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला यामुळे राज्यात शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेल्या नितेश राणे यांनी २४ तासांसाठी पोलिसांना सुट्टी द्या, म्हणजे शिवसेनेला योग्य प्रत्युत्तर देऊ असे आव्हान दिले होते. त्याला आता शिवसेनेकडूनही तेवढ्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेला आव्हान देणाऱ्या नितेश राणे यांनी त्यांच्यासोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं, असं प्रतिआव्हान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

नितेश राणेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वैभव नाईक म्हणाले की, काल किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे. तर आज नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळी परिस्थिती बाजूला ठेवू शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणेंनी आपल्याबरोबर असलेले पोलीस आणि पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं, असं आव्हान शिवसेनेच्यावतीने मी देतो, असे वैभव नाईक म्हणाले.

यावेळी केंद्र सरकारकडून भाजपा नेत्यांनी घेतलेल्या संरक्षणावरूनही वैभव नाईक यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, नारायण राणे यांना महाराष्ट्राची सुरक्षा कमी पडली म्हणून त्यांनी केंद्र सरकारकडून सुरक्षा घेतली आहे. अनेक नेत्यांनी केंद्राची सुरक्षा घेतली आहे. त्यामुळे कोण कोणाला घाबरतो, हे सर्व जनतेला आणि महाराष्ट्राल माहिती आहे, असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर नितेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,  नामर्दानगीने हल्ले करणं आणि पोलीस संरक्षणात हल्ले करणं ह्यालाच उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणतात. बाळासाहेबांच्या काळातील  शिवसेना पाहिली तर तेव्हा विरोधी पक्षात असतानाही शिवसैनिकांनी अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. आता हा नामर्दांचा प्रकार, नवी शिवसेना समोर आली आहे. त्यांना कसं सामोरं जायचं हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच मी ट्विट करून सांगितलं की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी २४ तासांसाठी पोलिसांना सुट्टी द्यावी. मग या हल्ले करणाऱ्यांचं काय करायचं हे आम्ही पाहू. आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू, दगडांच्या भाषेला दगडांनी उत्तर देऊ, गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर देऊ. आम्हाला सगळे विषय माहिती आहे. पण आम्हाला राज्यातील कायदा सुव्यवस्था खराब करायची नाही आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. 

टॅग्स :नीतेश राणे वैभव नाईक शिवसेनाभाजपा