- यदु जोशीमुंबई : ‘आमच्या मतदारसंघांमध्ये रस्त्यांसाठी पुरेसा निधी दिला नाही तर अर्थसंकल्प सादर होताना आम्ही बहिष्कार टाकू’, असा इशारा शिवसेनेच्या २५ आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर चक्रे फिरली आणि शिवसेनेच्या आमदार, खासदारांना तब्बल १९०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
शिवसेनेच्या २५ आमदारांच्या दबाव गटाने मुख्यमंत्र्यांना भेटून दिलेल्या इशाऱ्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम दिले होते. प्रकाश आबिटकर, आशीष जयस्वाल, वैभव नाईक, आदी ग्रामीण भागातील आमदारांनी या दबाव गटाचे नेतृत्व केले होते. शिवसेना आमदार आणि समर्थित आमदार असे मिळून ४७ आमदारांना बांधकाम विभागाच्या निधी वाटपात समान न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी होती. आमदारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सूत्रे हलली.
स्वपक्षीय आमदारांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपविली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेतील अनुभवी आमदारांनी बसून ग्रामीण भागातील प्रत्येक आमदार, खासदारांच्या मतदारसंघात आगामी वर्षात बांधावयाच्या रस्त्यांसाठीचे प्रस्ताव तयार केले. त्यांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला.
ग्रामीण भागातील शिवसेनेच्या १० खासदारांनी सुचविलेल्या प्रत्येकी १० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे त्यामुळे मार्गी लागणार आहेत. शिवसेनेखालोखाल काँग्रेसचे आमदार व नंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना रस्त्यांसाठीचे निधीवाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या एकेका आमदाराच्या वाट्याला सुमारे ३८ कोटी रुपयांची कामे गेली आहेत.