मुंबई - कोल्हापूर, सांगली याठिकाणी आलेल्या महापूराचा आढावा घेण्यासाठी आज महसलू मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होती. यासाठी कोल्हापुरातील शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील आले होते. त्यांच्यासोबत शिवसेना जयप्रकाश मुंदडाही उपस्थित होते.
मात्र या शिवसेना आमदारांना सह्याद्री अतिथीगृहाच्या गेटवरच पोलिसांनी अडवले. सह्याद्रीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक सुरू असल्याने पोलिसांनी या आमदारांना बाहेरच थांबवून ठेवले. मात्र बैठकीसाठी चंद्रकांत पाटील यांनी बोलविल्याने अशाप्रकारे पोलिसांनी अडवणूक केल्याने शिवसेना आमदार संतप्त झाले.
शिवसेना आमदारांना गेटवरच अडवल्याने काही काळ परिसरात गोंधळ उडाला. वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली. आत घेणार नसेल तर गेटवरच ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका संतप्त आमदारांनी घेतल्याने सह्याद्री अतिथीगृहाच्या गेटवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
यावेळी बोलताना जयप्रकाश मुंदडांनी सांगितले की, मराठवाड्यातील दुष्काळ आणि कोल्हापूर, सांगलीतील महापुराबाबत बैठक घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना बोलविले होते. सकाळी 9.30 वाजता बैठकीला बोलविले असताना आमदारांना अतिथीगृहात प्रवेश दिला नाही. पोलिसांनी आमदारांना दिलेली वागणूक योग्य नाही. आम्ही त्याचा निषेध करतो असं त्यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता त्यावर चर्चा करण्यासाठी आमदारांना सह्याद्री अतिथिगृहावर बोलविलं होतं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं की, मुख्यमंत्र्यांसमोर आपण परिस्थितीची माहिती देऊ. पण आतमध्ये प्रवेशच दिला गेला नाही. त्यामुळे आमदारांना सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरच ताटकळत राहावं लागलं असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर सुरू होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही सह्याद्री अतिथीगृहात प्रवेश दिला जात नाही. मात्र बैठकीसाठी आमदारांना बोलवून ताटकळत अतिथीगृहाच्या बाहेर उभं करायचं या प्रकारावर आमदार संतप्त झाले. बैठक सुरू असताना आमदारांना अतिथीगृहात आतमध्ये बसण्याची व्यवस्था करायला हवी होती अशी भावना शिवसेना आमदारांनी व्यक्त केली.