सरकारमध्ये राहण्यासाठी आता शिवसेना आमदारांचे साकडे, मराठवाड्यातील आमदार आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:44 AM2017-09-26T02:44:07+5:302017-09-26T02:44:21+5:30
आठवडाभरापूर्वी मातोश्रीवरील बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आग्रही असलेले शिवसेनेचे आमदार आता बॅकफूटवर गेले असून, त्यांनी सरकारमध्येच राहिले पाहिजे, पण शिवसेनेचे मंत्री बदला, अशी भूमिका घेतली आहे.
मुंबई : आठवडाभरापूर्वी मातोश्रीवरील बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याबाबत आग्रही असलेले शिवसेनेचे आमदार आता बॅकफूटवर गेले असून, त्यांनी सरकारमध्येच राहिले पाहिजे, पण शिवसेनेचे मंत्री बदला, अशी भूमिका घेतली आहे. मराठवाड्याचे सेनेचे आमदार मंगळवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे हे दसरा मेळाव्यात सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका जाहीर करतील, असे म्हटले जात होते. मराठवाड्यातील १० आमदार मंगळवारी त्यांना भेटणार असून, सत्ता सोडण्याचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, असे साकडे घालणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाहेरच्या चर्चेत तथ्य नाही
नांदेडमधील देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मातोश्रीवरील बैठक ही नियमित स्वरूपाची आहे. अधूनमधून अशा बैठकी होत असतात. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी आग्रह धरणार असल्याचा त्यांनी इन्कार केला. जी चर्चा बाहेर सुरू आहे, त्यात तथ्य नाही.
मराठवाड्याच्या भावना कानावर घालू
औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मराठवाड्यातील सेना आमदारांच्या भावना आम्ही उद्धवजींच्या कानावर घालू. सत्तेतून बाहेर पडा,
असे सांगण्यासाठी आम्ही जात नसून, सगळे विषय पक्षांतर्गत असतील.
या बैठकीला पैठणचे आमदार सांदिपान भुमरे उपस्थित नसतील. ते साखर कारखाना निवडणुकीत व्यग्र आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव पक्षावर नाराज आहेत, तर प्रतापराव चिखलीकर यांचे अलीकडे भाजपाशी सख्य वाढले आहे. त्यामुळे हे दोघेही बैठकीला हजर राहण्याची शक्यता नाही.