महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने घेतली शिवसेनेच्या आमदारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 07:26 PM2019-11-11T19:26:35+5:302019-11-11T20:34:22+5:30
मच्छिमारांना आर्थिक मदत करण्याची मागणी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: गेल्या शनिवार रात्रीपासून शिवसेनेच्या 56 आमदारांचा मुक्काम हा मालाड पश्चिम येथील मढच्या रिसॉर्ट हॉटेल मध्ये आहे.सदर संधी साधत आज दुपारी मढच्या रिट्रीट हॉटेल मध्ये जाऊन महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या वतीने समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांची भेट घेऊन त्यांना मच्छिमारांना आर्थिक मदत करण्याची आग्रही मागणी केली.
किरण कोळी हे आजारी असल्याने त्यांनी थेट हॉस्पिटल मधून थेट येथील रिट्रीट हॉटेलवर आले. यावेळी मच्छिमारांच्या झालेल्या नुकसानी बाबत त्यांनी माजी राज्यमंत्री दिपक केसरकर,आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार,आमदार वैभव नाईक,आमदार श्रीनिवास वनगा,विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांची भेट घेतली.
गेल्या 1 ऑगस्ट पासून आलेली वादळे,अतिवृष्टीमुळे मासेमारीचा सुगीचा हंगाम असलेले महत्वाचे 90 दिवस वाया गेले असून मच्छिमारांच्या कुटुंबियांवर आलेल्या नैसर्गिक आपत्ती बाबत सविस्तर चर्चा केली.त्यामुळे राज्यातील अपादग्रस्त मच्छिमारांचे सर्वेक्षण करून त्यांना सुमारे 1000 कोटींची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी किरण कोळी यांनी केली.
शिवसेना ही सागरपुत्रांच्या पाठीशी असून आपल्या मागण्या आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करणार असून महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होताच राज्यातील मच्छिमारांच्या सर्व मागण्या मान्य होतील आणि तुम्हाला आर्थिक मदत मिळण्यासाठी शिवसेना सर्व सहकार्य करणार असे आश्वासन या आमदारांनी दिले अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, समाजसेवक संजय सुतार, मढ मच्छिमार स. स. सो. लि. चे संचालक उपेश कोळी, हरबादेवी मच्छिमार स.स.सो.लि. चे उपाध्यक्ष कृष्णा कोळी, समाजसेवक नरेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.