संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना, मनसेची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:16 AM2018-10-09T02:16:40+5:302018-10-09T02:17:06+5:30

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा मुंबई आणि परप्रांतीयांचा मुद्दा चर्चेत आला आहे. उत्तर भारतीय लोक मुंबई चालवितात, त्यांनी मनात आणले तर मुंबई ठप्प होईल, या निरुपमांच्या विधानावर शिवसेना आणि मनसेने सोमवारी जोरदार आगपाखड केली.

Shiv Sena, MNS attacks Nirupam over his remarks | संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना, मनसेची आगपाखड

संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना, मनसेची आगपाखड

googlenewsNext

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा मुंबई आणि परप्रांतीयांचा मुद्दा चर्चेत आला आहे. उत्तर भारतीय लोक मुंबई चालवितात, त्यांनी मनात आणले तर मुंबई ठप्प होईल, या निरुपमांच्या विधानावर शिवसेना आणि मनसेने सोमवारी जोरदार आगपाखड केली. ग्रामपंचायतही जिंकायची पात्रता नसलेले लोक अशी विधाने करीत असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. तर, एकदा बंद करूनच दाखवा, असे आव्हान मनसेने दिले आहे.
रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना संजय निरुपम यांनी उत्तर भारतीय मुंबई चालवतात, त्यांनी मनात आणले तर महाराष्ट्र ठप्प होईल, असे वक्तव्य केले होते. उत्तर भारतीय राज्यातील सर्वच क्षेत्रांत सक्रिय असल्याचाही दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर शिवसेना आणि मनसेने तीव्र हरकत घेतली आहे. ‘मुंबई ही मराठी माणसाची आहे. संजय निरुपम आणि काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीतही निवडून येण्याची पात्रता सध्या काँग्रेसची नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत निरुपम यांना मुंबईकर जनता त्यांची जागा नक्की दाखवून देईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
तर, उत्तर भारतीयांनी काम थांबविल्यास ठप्प व्हायला मुंबई म्हणजे काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्यालय वाटले का, असा सवाल करीत एकदा निरुपम यांनी मुंबई बंद करूनच दाखवावी, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले. निरुपम यांचे पक्षातील स्थान डळमळीत आहे. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या आडून आपले पद शाबूत ठेवण्यासाठी निरुपम असली विधाने करीत आहेत. त्यांच्या या विधानांना मुंबईतील उत्तर भारतीय मंडळीही स्वीकारणार नाहीत, असे देशपांडे म्हणाले.

काँग्रेसचा निरूपम यांना घरचा अहेर
१उत्तर भारतीयांनी ठरविल्यास मुंबई ठप्प होईल, या संजय निरूपम यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. मुंबई सर्वांची असल्याचे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. मात्र, समाजात फूट पाडण्याची काँग्रेसची भूमिका नाही, निरूपम यांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नसल्याची भूमिका बहुतांश काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.
२उत्तर भारतीयच मुंबई चालवितात. त्यांनी ठरविले, तर मुंबई आणि महाराष्ट्र ठप्प होईल, असे विधान निरूपम यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत, तर काँग्रेसनेही निरूपम यांच्या विधानावरून हात झटकले आहेत. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना निरुपम यांनी तसे विधान केले असेल, परंतु ती पक्षाची भूमिका नाही. मुंबई सर्वांची असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. मात्र, अशा प्रकारचे विधान योग्य नाही. याबाबत निरूपम यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियात पोस्टरबाजी
सोशल मीडियातून मनसेने संजय निरुपम यांचा खरपूस समाचार घेतला. निरुपम हा परप्रांतीय भटका कुत्रा असून, केवळ परप्रांतीय मतांवर डोळा ठेवत ते अशी विधाने करीत असल्याची पोस्टरबाजी मनसेने केली आहे.

‘मुंबईवर सर्वांचा समान हक्क’
काँग्रेस पक्ष धर्म, जात आणि भाषेच्या आधारावर भेदभाव करत नाही. कोणी कोणत्याही धर्माचा, जातीचा असो, अथवा कोणती भाषा बोलतात, कोणत्या राज्यातून आले आहेत, हा मुद्दा दुय्यम आहे. मुंबई सर्वांची आहे, मुंबईवर सर्वांचा समान हक्क आहे.
- मिलिंद देवरा, काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री.

Web Title: Shiv Sena, MNS attacks Nirupam over his remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.