शिवसेना शिंदे गटाचा 'कार्टुन'मधून उबाठाला टोला; तुतारीच्या फुंकीतून विझली मशाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:23 AM2024-02-26T10:23:35+5:302024-02-26T10:24:29+5:30
तुतारी चिन्ह मिळाल्याचा आनंद राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला असून रायगडावर या चिन्हाचा अनावरण सोहळाही पार पडला.
मुंबई - राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर बहुमताच्या जोरावर ह्या पक्ष आणि चिन्हाचे वाटप झाले. त्यानुसार, शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ चिन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले. त्यामुळे, दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही फूट पडली आहे. त्यातच, शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाकडून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जाहीर झाले आहे.
तुतारी चिन्ह मिळाल्याचा आनंद राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केला असून रायगडावर या चिन्हाचा अनावरण सोहळाही पार पडला. मात्र, तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर विरोधकांकडून राष्ट्रवादीची खिल्ली उडवण्यात येत आहे. तर, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी व समर्थकांनी हाताने तुतारी वाजवून विजयाची मशाल पेटवू.. असे म्हणत महायुतीला टोला लगावला होता. त्यानंतर, आता महायुतीच्या नेत्यांकडूनही तुतारी चिन्हावरुन राष्ट्रवादी व शिवसेनेची खिल्ली उडवली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन कार्टुन चित्राद्वारे तुतारी आणि मशाल या दोन्ही चिन्हांची खिल्ली उडवण्यात आली आहे. शिवसेनेकडून एक चित्र शेअर करण्यात आलं असून या चित्रात तुतारी फूंकल्याने मशाली विझल्याचं दर्शवण्यात आलं आहे. शरद पवारांचे कार्टुन काढून त्यांच्या हाती तुतारी देण्यात आली आहे. तर, उद्धव ठाकरेंचं कार्टुन असलेल्या हाती विझलेली मशाल दिसून येत आहे. त्यासोबतच, एक कॅप्शनही लिहिण्यात आले आहे.
एक तुतारी द्या मज आणून
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) February 25, 2024
विझवेल मशाल मी स्वप्राणाने pic.twitter.com/qSfeHqgRfK
एक तुतारी द्या मज आणून
विझवेल मशाल मी स्वप्राणाने
असे खोचक कॅप्शन लिहून तुतारीच्या फुंकीने मशाल विझल्याचं या चित्रातून दिसून येत आहे. दरम्यान, तुतारी चिन्ह मिळाल्याचा अभिमान असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर, महायुतीच्या नेत्यांकडून तुतारी आणि मशाल चिन्हाची खिल्ली उडवली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी झोपलेल्या कुंभकरणाला तुतारी वाजवून उठवण्यात येत असल्याचं व्हिडिओ शेअर केला होता. त्यानतंर, जितेंद्र आव्हाड आणि मिटकरी यांच्यात तुतारीवरून जोरदार जुंपल्याचंही पाहायला मिळालं.