सदा सरवणकरांनी दोनदा गोळीबार केला; कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवू, अरविंद सावंतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 02:31 PM2022-09-11T14:31:38+5:302022-09-11T14:31:47+5:30
प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे-शिंदे गटात सुरु असलेल्या तणावाचं रुपांतर मारामारीत झाल्याचं दादरमध्ये पाहायला मिळालं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्यावेळी प्रभादेवीत शिंदे गटाचे सरवणकर समर्थक कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने वेळीच संघर्ष टळला. मात्र या वादाचे पडसाद पुन्हा उमटले आहेत.
प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणानंतर आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले होते. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार सदा सरवणकर यांनी दोन ठिकाणी गोळीबार केला. त्याच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली. तसेच योग्य कारवाई न केल्यास खरी शिवसेना दाखवून देऊ, असा इशारा देखील अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.
तक्रार करण्यासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर नेमका कुणाचा दबाव आहे?, असा सवाल अरविंद सावतं यांनी उपस्थित केला. शिंदे गटाकडून गुंडागिरी सुरु आहे. सोशल मीडियावरुन शिवसेनेची बदनामी केली जातेय, असा दावाही अरविंद सावंत यांनी यावेळी केला.
एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात- संतोष तेलवणे
सदर प्रकरणाबाबत शिंदे गटातील संतोष तेलवणे म्हणाले की, मी इमारतीखाली उभे असताना ५० जण माझ्यासमोर आले आणि माझ्याशी वाद घातला. मी एकटा त्यांना पुरेसा होतो. हात लावायचं तर ठार मारा, जिवंत ठेवला तर तुम्हाला एकेएकेला घरातून उचलून मारेन. आम्ही पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पूर्वीची शिवसेना राहिला नाही. आधी १-२ जण मारायला जायचे आता एका शाखाप्रमुखाला मारायला ५० जण येतात. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जात आहोत असं त्यांनी म्हटलं.