मुंबई- माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. माझी हकालपट्टी करण्यात आलेली नाही. त्याआधीच मी राजीनामा दिला आहे आणि उद्धव ठाकरे अशी किती जणांची हकालपट्टी करणार आहेत?, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीच शिवसेना संपवल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला.
ज्या दिवशी ही महाविकास आघाडी बनत होती. त्याचवेळी मी विरोध केला होता. पण माझं ऐकलं गेलं नाही. शिवसेनेसाठी आयुष्याची ५२ वर्ष खर्च केली. त्याच रामदास कदमला मातोश्रीवर बोलावून माध्यमांमध्ये बोलायचं नाही असा आदेश मला उद्धव ठाकरेंनी दिला. तो मी मानला. गेल्या तीन वर्षांपासून मी तोंड बंद ठेवून बुक्क्यांचा मार सहन करत आहे. तरीही आज तुम्ही माझी हकालपट्टी करायला निघालात. याबद्दल मला खूप आजही वेदना होतात. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण मी बोलत नाहीय. कारण मी बोललो तर भूकंप होईल. बाळासाहेबांमुळे मी अजूनही शांत आहे, असं रामदास कदम म्हणाले.
रामदास कमद यांच्या या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम यांनी स्वत:च आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून रामदास कदम अडीच वर्षांमध्ये एकदाही मातोश्रीवर फिरकले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा अभिनंदन करण्यासाठीही रामदास कदम आले नव्हते, इतक्या कुपमंडकू वृत्तीचे ते आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले.
आज पक्ष अडचणीत आला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी तुम्हाला काय दिलं नाही? तुम्ही विधानसभा निवडणुकीत पडलात, लोकांनी तुम्हाला पराभूत केले. त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पुनर्वसनाचा आग्रह धरला. या काळात रामदास कदम यांचं राष्ट्रवादी काँग्रेसशी साटलोटं सुरु होतं. रामदास कदम यांच्याकडून वेगळे प्रयत्न सुरु होते, असा आरोपही अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्यावर केला.
दरम्यान, शिवसेनेत पक्षाकडून होणारी अवहेलना मनला लागली आहे. माझ्या कुटुंबावर आणि मनावरही त्याचा परिणाम होत आहे. म्हणूनच मला नीट जेवण जात नाही, गेल्या महिनाभरापासून मी शांतपणे झोपलोही नाही. मध्यरात्री २-३ वाजता अचानक झोपेतून उठतो, अशी अवस्था झाल्याचं दु:ख रामदास कदम यांनी आज माध्यमांसमोर मांडलं. गेल्या पावणे तीन वर्षात मी मातोश्रीची पायरी चढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा शिवसेनेचा निर्णय योग्य नसल्याचे सांगत मी मातोश्रीतून बाहेर पडलो होतो, तेव्हापासून आजतागायत मी मातोश्रीत गेलो नाही, अशी आठवणही कदम यांनी आज माध्यमांसमोर व्यक्त केली.