मुंबई- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात संकटं वाढली आहेत. मुख्यमंत्री घरातून बाहेर निघत नाहीत. संकटांमधून बाहेर निघण्यासाठी त्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. मातोश्री आमचं श्रद्धास्थान आहे. आम्ही अत्यंत श्रद्धेनं अमरावती ते मातोश्री अशी वारी करु. आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालीसाचं वाचन करु, असा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे.
राणा दाम्पत्याला मुंबईत जाऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र तरीही अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत दाखल झाले आहेत. गनिमी काव्याने राणा दाम्पत्य आज पहाटे मुंबईत पोहोचलं आहे. परंतु ते कुठे आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
राणा दाम्पत्याने शिवसेनेला डिवचू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. तसेच मातोश्री आमच्यासाठी रायगड आहे. आमचं ते श्रद्धास्थान आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. भाजपाने स्पॉन्सर केलेलं हे आंदोलन आहे, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अंगावर आलात, तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठाणासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांना खार पोलिसांनी १४९ ची नोटीस दिली आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली असून त्यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे.
दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं वाचन करण्याचा निर्धार राणा दाम्पत्याने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्री या त्याच्या खासगी आणि वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानची सुरक्षाही वाढवली आहे.