Join us

"ठाकरेंनी भरभरून दिले मग त्यांनी मुख्यमंत्रिपद, १ आमदारकी घेतली तर बिघडलं कुठे?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:48 PM

बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील मंत्र्यांना विचारला आहे.

मुंबई - ज्या ठाकरे घराण्याने महाराष्ट्रातील सामान्य माणसाला असामान्य बनवलं. रिक्षावाला, शिपाई, टॅक्सीवाला, कारकून वेगवेगळ्या पदावर पोहचले. त्या घराण्याने स्वत:साठी काय घेतलं? पहिल्यांदाच त्या घरातील मुलगा आमदार झाला. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला त्याचा आनंद व्हायला हवा होता. ज्यांनी भरभरून दिले त्यांनी एकदा घेतले मग बिघडलं कुठे? त्यांच्या पाठित खंजीर का खुपसला असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटातील आमदारांना विचारला. 

अरविंद सावंत म्हणाले की, बाळासाहेबांचा फोटो काढून तुमचा पक्ष काढावा. पण ती हिंमत नाही. नाव आमचं वापरायचं. शिवसेना म्हणायचं. मग शपथविधी घेताना तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे नाव विसरलात का? ठाकरे घराण्याने तुम्हाला सगळं दिलं. त्यांनी एखादवेळेस पद घेतले त्याचा आनंद व्हायला हवा होता. अडीच वर्ष सहन करू शकला नाहीत. तुमच्या ईडीच्या कारवाया, खोटं बोलायचं. गैरव्यवहार त्यातून काढलेली पळवाट आहे अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

तसेच ज्यांचा आकडा मोठा त्यांचाच विरोधी पक्षनेतेपद, विधान परिषदेत आमचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आमचाच आहे. नियमानुसार तेच असते असं सांगत शिवसेनेवर काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य केले. त्याचसोबत ९ ऑगस्ट क्रांती दिनाला शपथविधीमुळे महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. आमच्याकडे या पावन होतो. भ्रष्टाचार करा, आरोप करा काहीही करा. ज्यांना चले जाव म्हणायचं त्यांनीच शपथ घेतली. जनमाणसाचा कानोसा घ्या ही सगळी माणसं लोकांच्या मनातून उतरली आहेत असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. 

संजय राठोडांना मंत्रिपद यावरून सरकारवर टीकास्त्रदेवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांचे वक्तव्य सातत्याने लोकांना दाखवावं. धुलाई मशिनमध्ये पावन झालेली लोकं आहेत. न्याय कसा असतो ते पाहा. आमच्याकडे आलात तर तुम्ही पावन होता. दुसऱ्यांकडे असले तर भ्रष्टाचारी, अत्याचारी होता. महाराष्ट्र हे सगळं उघड्या डोळ्याने बघतोय असं सांगत अरविंद सावंत यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :शिवसेनाअरविंद सावंतएकनाथ शिंदेभाजपा