Video : घरात घुसून मारेन... शिवसेना खासदाराची भाजपा आमदाराला थेट धमकी
By महेश गलांडे | Published: January 29, 2021 08:44 AM2021-01-29T08:44:33+5:302021-01-29T09:01:12+5:30
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद होण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चौकामध्ये आंदोलनही केले.
वाशिम - शिवसेना खासदारभावना गवळी आणि भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झालीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये खासदार गवळी यांनी भाजपा आमदाराला थेट धमकी दिलीय. त्यामुळे, वाशिम जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही या व्हिडिओचीच दिवसभर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार-खासदाराची ही बाचाबाची पाहून उपस्थित कार्यकर्तेही अवाक झाले होते, शेवटी सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन बैठकीतीला हा तंटा मिटवला. पण, याची चर्चा अद्यापही सगळीकडे सुरुच आहे.
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद होण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चौकामध्ये आंदोलनही केले. त्यामुळे शहरातील दुकानदारांनी सुध्दा घाबरून आपली प्रतिष्ठाने बंद केली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद होते, परंतु त्यावर दोन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवत होते. परंतु या मतभेदाचा बांध प्रजासत्ताक दिनी फुटला असून नागरिकांत चर्चेला उधाण आले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला?
खासदार भावना गवळी यांनी भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांना थेट धकमी दिल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. जास्तीचे नाटकं नाही करायचे, तुला घरात घुसून मारेन... अशी सीबीआय चौकशी लावेल माय-बाप दिसेल, असे खासदार गवळी यांनी म्हटल्याचे या व्हिडिओत ऐकू येत आहे. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली असून एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात राजकीय चर्चेला उधाण आले. जिल्हयात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्हयाचा विकास करण्याऐवजी लोकप्रतिनिधीच आपसात भांडत बसणार तर सर्व सामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न नागरिकांतून केल्या जात आहे.
नेत्यांनी भांडणापेक्षा जिल्हा विकासाकडे लक्ष्य द्यावे
संपूर्ण दिवसभर जिल्हयात या घटनेची चर्चा सर्वांच्या तोंडी ऐकावयास मिळाली. जिल्हावासियांच्या समस्या सह जिल्हयाच्या विकासाबाबतचे मुद्दे बाजूला हाेऊन या वादामुळे जिल्हयातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकांविरुध्द वाशिम पोलीसांत तक्रार दाखल केली. या वादाबाबत शहरात विविध विषय चर्चिल्या जात आहे. परंतु दोघांनीही दिलेल्या तक्रारीवरुन वेगळीच बाब स्पष्ट होताना दिसून येत आहे. नेत्यांनी भांडणापेक्षा जिल्हा विकासाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. लोकप्रतिनिधीच भांडत बसणार तर सर्वसामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे. दोन्ही नेत्यांनी पोलीसात तक्रार दिली असली तरी नेमका वाद कशावरुन याबाबत २६ जानेवारी रोजी दोघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.