शिवसेना खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय कोरोना रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना’ या योजनांच्या माध्यमातून मोफत कोरोना उपचार द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवर पडणाऱ्या आर्थिक ताणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्यमवर्गीय रहिवासी सोसायट्या, इमारती यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच, कुटुंबातील एका व्यक्तीला लागण झाली की अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढते आहे. सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांवर आधीच मोठ्या प्रमाणात ताण असल्याने मध्यमवर्गीय रुग्णांना परिसरातील नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे लागते. एका कोरोना रुग्णाचे १० दिवसांचे कमीत कमी बिल साधारण दीड ते दोन लाख रुपये होते. त्यातच घरातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित झाल्यास हा आकडा कमीत कमी दहा लाखांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर मोठा आर्थिक ताण पडतो. याचा सहानुभूतिपूर्वक विचार करून या रुग्णांचा ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ किंवा ‘आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना’ या योजनांमध्ये समावेश करून त्यांना मोफत कोरोना उपचार दिल्यास राज्यातील मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल, असे शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
.....................................