मुंबई - आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले शिवसेनेचे १३ खासदार हे NDA च्या घटक पक्षाचे आहोत. त्यामुळे आमची कामे झाली पाहिजे. महायुतीत आम्हाला भाजपाकडून सापत्न वागणूक मिळतेय असं विधान शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी केले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपात बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांची बैठक झाली. या बैठकीत खासदारांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यासोबत मतदारसंघात तयारी करण्याची सूचना देण्यात आली. या बैठकीत काही खासदारांनी भाजपाकडून मिळत असलेल्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे करावे अशीही चर्चा करण्यात आली.
याबाबत गजानन किर्तीकर म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र लढले होते. त्यावेळी २२ जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे केले. २६ भाजपाचे उमेदवार उभे राहिले. २६ पैकी २३ निवडून आले. शिवसेनेचे १८ निवडून आले. आमची तयारी पूर्ण झाली आहे. इतके मोठे सरकार बनवले त्यामुळे २२ जागांसाठी आमची तयारी आहे. त्यामुळे आम्ही दावा करत नाही, त्या २२ जागा आमच्याच आहेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच संजय राऊत हे लोकांच्या मनोरंजनाचे साधन झालेत, त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ नाही. संजय राऊत कोट्या करण्याचं काम करतात. महाराष्ट्रातील जनतेला घरबसल्या मनोरंजनाचा कार्यक्रम झाला आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना खासदारांच्या बैठकीत पक्ष दुभंगतोय, तोडगा काढा, जुळवून घ्या बोललो होतो पण त्यांनी केले नाही. त्यामुळे आता हे दोन्ही एकत्रित येतील हा विषय संपला आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितले.