मुंबई - शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर यांची खासदारकी वादात अडकली आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र वायकर यांच्या विजयाला ठाकरे गटाने कोर्टात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माझ्याविरोधात खोटा प्रचार सुरू केला आहे तो विरोधकांनी थांबवावा. तुम्हाला कोर्टात जायचं तिथे जावं, कायदेशीर बाजू मांडावी परंतु खोटेपणा करू नये. कोणाचा दबाव होता हे मी सांगू शकत नाही. मतमोजणी ठिकाणी कॅमेरे लावले होते. ज्याने तक्रार केली त्याला १ हजार मते तरी पडलीत का? कोणाच्या सांगण्यावरून त्याने तक्रार केली. पारदर्शकपणे निवडणूक झाली आहे. जर माझ्या इथे असा प्रचार केला जात असेल तर ज्याठिकाणी या लोकांचे उमेदवार निवडून आलेत तिथे त्यांनी हा प्रकार केलाय का? असा सवाल त्यांनी ठाकरे गटाला विचारला.
तसेच मोबाईलबाबतीत आरोप करत असतील तर तुम्हीदेखील बॉडीगार्ड घेऊन मतमोजणी केंद्रात आला होता तेदेखील चुकीचे आहे ना?, ज्या गोष्टी करायच्या त्या कायदेशीर करा. मला कुणालाही दुखावयाचे नाही. मी लोकांची कामे करायला आलो आहे. कुणाला तरी टार्गेट करायचे म्हणून मला टार्गेट केले जात आहे. कायदेशीर ज्या गोष्टी असतील त्या सर्व कराव्यात असंही खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.
दरम्यान, खासदारकीची शपथ ही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही, ईश्वरांच्या साक्षीने कायदेशीर शपथ मी घेणार आहे. मी जिंकून आलो आहे त्यामुळे कायद्यानुसार जे आहे ते होणार आहे असं सांगत खासदार रवींद्र वायकरांनी संजय राऊतांना टोला लगावला.
राज ठाकरेंचे आभार मानले
राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांचे आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळालं होतं. त्यामुळे जिंकून आल्यानंतर राज ठाकरेंचे आभार मानायला मी आलो होतो असं खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटलं.