Sanjay Raut: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. आताच्या घडीला संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात असून, हा मुक्काम वाढला आहे. कारण संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, यावरील सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या सुनावणीवेळी संजय राऊत हे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
पुढील सुनावणीवेळी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार
संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील पुढील होणाऱ्या सुनावणीवेळी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे. न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीचत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, यापूर्वी झालेल्या सुनावणीतही ईडीने संजय राऊत यांच्या जामीनाला जोरदार विरोध दर्शवला होता.
दरम्यान, पत्राचाळीच्या १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय नेते आहेत. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यास राऊत साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देऊ नये, असे ईडीने म्हटले होते.