Andheri Bypoll 2022: आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. वरिष्ठांशी झालेल्या बैठकीनंतर या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यावरून आता विरोधकांकडून भाजपवर टीका होताना दिसत आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी भाजपला पत्र लिहिणे हा स्क्रिप्टचा एक भाग होता. भाजपला पराभव दिसत असल्यानेच माघार घेतल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली असून, आताच्या घडीला संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात आहेत. जामीन अर्जावरील सुनावणीवेळी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना राज ठाकरे आणि भाजपवर हल्लाबोल केला.
राज ठाकरेंनी भाजपला पत्र लिहिणे हा ‘स्क्रिप्ट’चा भाग
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे 'स्क्रिप्ट'चाच भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. त्यामुळेच भाजपने उमेदवार मागे घेतला. अंधेरी पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपने या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"