Join us

संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:49 AM

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आल्याने दसरा आर्थर रोड कारागृहातच जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे आणि त्याच दिवशी त्यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा दसरा आर्थर रोड कारागृहातच जाणार आहे. 

नियमित न्यायालयाचे न्यायाधीश अनुपस्थित असल्याने विशेष न्यायालयाने राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांनी जामिनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. संजय राऊत यांच्या बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला असून, ईडीचा युक्तिवाद होणे बाकी आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, न्यायाधीश न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 

पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. गेल्याच महिन्यात राऊतांवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकल्पावर आपले नियंत्रण राहावे, यासाठी राऊत यांनी त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना आपला मोहरा बनविले. प्रवीण राऊत संजय राऊत यांच्या वतीने कारभार चालवित होता, असा दावाही ईडीने आरोपपत्राद्वारे केला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालय