मुंबई- काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं राहुल गांधींच्या विधानाचं कुठलंही समर्थन केलं नसून ते विधान चुकीचंच आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यानंतर, संजय राऊत यांनीही राहुल गांधींचं ते विधान महाविकास आघाडीला धोका पोहोचवणारं असल्याचं म्हटलं आहे. तर, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही ते विधान रुचलं नसल्याचं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. कुणी सावरकरांवर प्रश्न उपस्थितीत केले म्हणून पंडीत नेहरूंवर विधान केले पाहिजे, निदान हे स्वत: सावरकरांचे वंशज म्हणून घेणाऱ्यांनी हे थांबवलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. आम्ही सगळे सावरकरांचे भक्त आहोत, असा सल्ला रणजीत सावरकर यांना दिला. तसेच आम्ही सगळे सावरकरांसाठी लढाई करत आहोत. हा देश पंडित जवाहरलाल नेहरुंचा ऋणी आहे. देशामध्ये स्वांतत्रलढ्यात प्रत्येकाच एक स्थान आणि योगदान आहे. देश बनवण्यासाठी अनेक लोकांनी त्याग केला आहे, हे विसरुनही चालणार नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं.
राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता. त्यानंतर राज्यातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले. यात प्रामुख्याने मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, प्रकाश महाजन, दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्त्वात मनसे कार्यकर्त्यांनी कुठे काळे झेंडे दाखवत तर कुठे राहुल गांधींचे पोस्टर फाडून निषेध नोंदवला. आज सकाळी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बुलढाण्यातून शेगावमध्ये पोहचली. त्याठिकाणी गजानन महाराज मंदिर परिसरात मनसे रायगड जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणे टाळले
गेल्या काही दिवसांपासून सावरकरांवरून वाद पेटलेला असताना शेगाव येथील सभेत खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणं टाळलं. मात्र भाजपावर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे, ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जिजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले असं राहुल गांधी म्हणाले. गृहमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा
काँग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करतायेत. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. परंतु महाराष्ट्रातील वातावरण त्यांना बिघडवू नये असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गुजरातच्या भावनगर येथे फडणवीस निवडणूक प्रचाराला गेले होते.