Join us

संसदेत इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती; रडण्यामध्ये नरेंद्र मोदींचा विक्रम- संजय राऊत

By मुकेश चव्हाण | Published: February 10, 2021 4:55 PM

यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले. 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांचा २ फेब्रुवारी रोजी संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना नरेंद्र मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावर, नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले. 

संजय राऊत म्हणाले की, संसदेत मंगळवारी झालेल्या प्रकारावर इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती. अशाप्रकारे अश्रूंचा बांध फुटणे हे काही नवीन नव्हते. देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात, हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण आतापर्यंत ५ ते ७ वेळा नरेंद्र मोदी भावनिक झाले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितले. यासोबतच दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा नरेंद्र मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. 

गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन मला आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असले तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तसेच या हल्ल्यात ८ लोक मारले गेले होते, तेव्हा प्रणब मुखर्जी संरक्षण मंत्री होते, मी त्यांना या पर्यटकांचे मृतदेह गुजरातमध्ये आणण्यासाठी संरक्षण खात्याच्या एअरप्लेनची मागणी केली, प्रणब मुखर्जी यांनी सांगितले चिंता करू नका, रात्री खूप उशीर झाला होता, पुन्हा गुलाम नबी आझाद यांचा मला फोन आला. ते एअरपोर्टवर होते, आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची त्या सदस्यांची काळजी घेतली...अशी चिंता....म्हणत ते वाक्य नरेंद्र मोदी पूर्ण करू शकले नाहीत, त्यांना गहिवरून आल्याचे दिसून आले होते. 

आम्ही नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार- 

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि गायिका लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट्स हे लोकांना जनतेविरोधी वाटत असतील आणि राज्य सरकार त्यांची चौकशी करणार असेल तरी यामध्ये चूक काय आहे. यावर आता भाजपाच्या लोकांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. आंदोलन करणे इतकं मोठी चूक काय झाली. भाजपाच्या या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागणार आहे. कारण एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात आंदोलन करू नका आणि महाराष्ट्रातील भाजपचे लोक आंदोलन करण्याची भाषा करतात. त्यामुळे भाजपाच्या लोकांची तक्रार आम्हाला आता नरेंद्र मोदींकडे करावी लागेल, असं संजय राऊत यांनी सांगितले. 

गुलाम नबी आझाद यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही- मोदी

गुलाम नबी आझाद यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, गुलाम नबी आझादांनी नेहमीच पक्षाची चिंता केली, पण यापुढे देश आणि सभागृह गुलाब नबी आझादांची चिंता करेल. देशासाठी आझाद यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी सॅल्यूट करतो, सत्ता जीवनात येते आणि जाते, मात्र तिची ओळख ठेवावी हे गुलाम नबी आझादांकडून शिकायला हवे. मित्राच्या नात्याने मी आझाद यांचा खूप आदर करतो असंही मोदी मंगळवारी राज्यसभेत म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदीसंजय राऊतभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरे