Join us

...तर भाजपाचा पराभव कसा करणार?, संजय राऊतांचा सवाल; UPAबाबतही केला मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:23 PM

देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितले आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युपीएचे (UPA) नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं, अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी पुन्हा व्यक्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा संजय राऊत यांनी यूपीएबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, युपीएविषयी बोलण्यासाठी त्यात असलं पाहिजे असं नाही. देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी अभ्यास करावा. या विषयावर सोनिया गांधी बोलणार असतील तर आम्ही उत्तर देऊ. या देशात उत्तम विरोधी पक्ष निर्माण झाला नाही तर भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर द्यावे. याचं दिल्लीत येऊन उत्तर द्यावे. महाराष्ट्रात बसून देऊ नये. हा विषय जिल्हा किंवा तालुक्याचा नाही, असा अप्रत्यक्ष टोला संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे. 

देशात उत्तम विरोधी पक्ष निर्माण झाला नाही तर भाजपाचा पराभव कसा करणार, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. भाजपासमोर लढायचं असेल युपीए मजबूत होणे गरजेचे आहे. ते मजबूत होऊ नये असं महाराष्ट्रील लोकांना वाटत असेल तर तसं स्पष्ट सांगावं. दिल्लीतील काही लोक युपीए 2 स्थापन करायच्या हालचाली करत आहेत. तसं होऊ नये म्हणून मी बोलत आहे, असा गौप्यस्फोट देखील संजय राऊत यांनी केला आहे.

यूपीएची चिंता संजय राऊतांनी करु नये- पटोले

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल विचारत, शिवसेना ही यूपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनिया गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. यूपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, असेही पटोले यावेळी म्हणाले. 

राऊत यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद- हुसैन दलवाई

यूपीएबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं काँग्रेस ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई म्हणाले. अशी हास्यास्पद वक्तव्य करण्याची संजय राऊतांना सवय आहे. ते अशी वक्तव्यं करतात आणि गोत्यात येतात. मुळात शिवसेना अजून यूपीएमध्ये नाही. त्यामुळं यूपीएत नसताना त्याचं प्रमुख कोण होणार याची चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. शरद पवार देखील असं बोलणार नाहीत, असं हुसैन दलवाई यांनी म्हटलं आहे.

नेमकं राऊत काय म्हणाले होते- 

सध्या देशात वेगळ्याप्रकारे सुरू आहेत. अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांचीही मागणी आहे. आज युपीएही विकलांग अवस्थेत आहे, असंही रोखठोक मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या मागे किती आमदार किंवा खासदार आहेत याचा हा प्रश्न नाही. संपूर्ण देशात जितके भाजप सोडून पक्ष आहेत जे आज युपीएमध्ये सामील नाहीत या सर्वांची ही एक मागणी आहे की युपीएचं पुनर्गठन झालं पाहिजे. युपीएच्या नेतृत्वात जर बदल झाले तर युपीए अधिक मजबूत होईल, असंही ते म्हणाले होते.

देशातील विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करायची असेल आणि यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांचा सहभाग असावा असं वाटत असेल तर युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. ही आमची वैयक्तिक मागणी नाही. शरद पवार हे युपीएचे प्रमुख बनतील का नाही हे मी सांगू शकत नाही. मी माझं मत लोकांचं मत सांगितलं. आम्ही दिल्लीत एकमेकांना भेटतो त्यावेळी चर्चा होतात. सध्या अधिवेशनही सुरू आहे. यात प्रामुख्यानं युपीएचं पुनर्गठन व्हावं ही चर्चा होत असते. जर तर ज्या गोष्टीत दम नाही. युपीएचं नेतृत्व अशा नेत्याच्या हाती असावं जे बगैर भाजप पक्षांना एकत्र घेऊन संघटना बनवतील," असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवसेनाकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार