मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१७ साली 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. महाराष्ट्रात युती होणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. मग असं असतानाही, आमच्या मागे रोड रोमियोसारखे का फिरता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असं म्हणत मागे धावणं हा कायद्याने गुन्हा आहे. आम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आम्ही लढणारे लोक आहोत, त्यामुळे ज्यांना पटकायचंय त्यांना स्वबळावरच पटकून दाखवू, असा निर्धारही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
'युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे', अशा शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी लातूरमधील बैठकीत शिवसेनेला इशारा दिला होता. २०१४ मध्ये युती नव्हती, तरीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही, ४८ पैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवा, असं सूचक विधान केलं होतं. भाजपाच्या या पवित्र्याचा, शहा यांच्या 'पटक देंगे'चा खरपूस समाचार खासदार राऊत यांनी घेतला.
२०१४ मध्ये भाजपाने युती तोडली. तेव्हा अमित शहाच पक्षाचे अध्यक्ष होते. तेव्हा ते 'गाडा' म्हणाले आणि आता 'जोडा' म्हणताहेत. ही काय लग्नाची बोलणी आहेत का? इथून तिथे फिरताहेत. २०१७ मध्ये शिवसैनिकांच्या विराट मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय आणि शिवसेना हा चिंतनावर नाही, तर पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे. छत्रपतीच्या महाराष्ट्रात आमच्या लढवय्या मावळ्यांनी अनेकांना मातीत लोळवलंय, आम्हाला पटकण्याची भाषा करणाऱ्यांना स्वबळावरच पटकू, असं राऊत यांनी निक्षून सांगितलं.
रोड रोमियोला नकार मिळाला तर त्याला फ्रस्ट्रेशन येतं किंवा तो वेडा होता, आत्महत्या करतो, विचित्र बडबडत सुटतो. अशीच अवस्था काही पक्षांची झाली आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. कार्यकारिणीतला ठराव म्हणजे काही बेडकाचा डराव नसतो. उद्धव ठाकरेंचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. इशारे, धमक्या या पलीकडे आहोत आम्ही, असं ठणकावत, भाजपाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
राजीनामे कधी देणार?
शिवसेनेचे मंत्री राजीनामे कधी देणार, हा प्रश्न राऊत यांनी खुबीने टाळला. शिवसेनेचे मंत्री राजीनामा देणार नसतील, तर भाजपाचे मंत्री राजीनामे देतील, असं त्यांचे काही नेते म्हणताहेत. त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा, असं सांगून त्यांनी या विषयाला बगल दिली.