लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना दि. ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
राऊत हे या दाव्यात दोषी आहेत की नाही, हे न्यायालयाला सांगतील. त्यानुसार दंडाधिकारी खटला पुढे सुरू ठेवतील वा दंड ठोठावतील. दरम्यान, १३ जुलै रोजी राऊत न्यायालयात उपस्थित राहिल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले. गेल्या महिन्यात न्यायालयाने संजय राऊत यांना समन्स बजावले होते. मात्र, राऊत हजर न राहिल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
संजय राऊत यांनी तथ्यहीन आरोप केल्याचे म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर मानहानी दावा दाखल केला. मीरा-भाईंदर येथे शौचालये बांधण्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्यासंदर्भातील वृत्त वाचल्याचे मेधा यांनी दाव्यात म्हटले आहे. केवळ माझी प्रतिष्ठा धुळीला मिळविण्यासाठी हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले, असे मेधा यांनी मानहानी दाव्यात म्हटले आहे.