जवळपास १०३ दिवसाच्या तुरुंगावासानंतर ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांचे ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. परंतु आता त्यांनी एका गोष्टीवरून राज ठाकरे आणि नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे.
“या लोकांनी आता परत फिरलं पाहिजे. खूप झालं आता. महाराष्ट्र कमजोर होतोय. महाराष्ट्र कमोजर केल्याबद्दल जनता भविष्यात या लोकांवर खटला चालवेल. जनतेच्या न्यायालयात यांच्यावर खटले चालवले जातील. हा तळतळात, तळमळ आहे. जी शिवसेना बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभी केली, त्याचे क्षणात तुमच्या स्वार्थासाठी दोन तुकडे केलेत,” असं राऊत म्हणाले. एबीपी माझावरील कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं.
… त्याबाबतीत राज ठाकरेंना मानतो“तुम्ही गेलात तर तुम्ही तुमचा वेगळा पक्ष स्थापन करा आणि मग आपल्याला आजमावा. त्याबाबतीत मी राज ठाकरेंना मानतो, नारायण राणेंचंही कौतुक केलंय. राणे सोडून गेले, त्यांनी आमच्यावर टीका केली. त्यांनी आपला पक्ष स्थापन केला पण त्यांना ते जमलं नाही, पण एका पक्षात त्यांनी आपला पक्ष विलिन केला. पण ही शिवसेना माझीच आणि ही शिवसेना मी संपवेन हा विचार चुकीचा आहे. हा महाराष्ट्राला परवडणारा नाही, मराठी माणसाचा घात करणारा आहे,” असंही ते म्हणाले.