Join us

Sanjay Raut: “वकिलांशी चर्चाही करायला मिळाली नाही, माझ्यावरील आरोप निराधार आणि खोटे”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 11:15 AM

Sanjay Raut: संजय राऊत यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत, अशी टिप्पणी कोर्टाने केली.

मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा मुक्काम आताच्या घडीला आर्थर रोड कारागृहात आहेत. सुरुवातीला ईडी कोठडी सुनावल्यानंतर पीएमएलए विशेष न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, संजय राऊत यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे ईडीचा ससेमिरा सुरू असून, दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात झाली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. 

संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई सुरू करून त्यांना विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सुरुवातीला संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. याचवेळी संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट काढावे, अशी विनंती मेधा सोमय्या यांच्यातर्फे शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात करण्यात आली होती. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी आपल्यावर आरोप निराधार असल्याचे सांगितले.

वकिलांशी चर्चाही करायला मिळाली नाही

संजय राऊत यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत, अशी टिप्पणी करत शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश पूर्वी दिले होते. संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडींतर्गत आर्थर रोड तुरुंगात असल्याचे मेधा सोमय्या यांचे वकील सनी जैन यांनी सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी राऊत यांना 'व्हीसी'द्वारे हजर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तुरुंग प्रशासनाने राऊत यांना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी तुम्हाला आरोप मान्य आहेत का, अशी विचारणा न्यायाधीशांनी त्यांना केली. तेव्हा, मला माझ्या वकिलांशी चर्चा करण्याची संधी मिळाली नाही, असे सांगत आरोप अमान्य असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच मी दोषी नाही. माझ्यावरील आरोप निराधार व खोटे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, मीरा-भाइंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी व देखभालीच्या प्रकल्पात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यात सोमय्या कुटुंबीयांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग आहे, असा आरोप करून राऊत यांनी माझी मानहानी केली, असा दावा करत मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.  

टॅग्स :संजय राऊतकिरीट सोमय्या