मुंबई-
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सेशन कोर्टानं २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा यापुढील मुक्काम आता मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे जामीनासाठी अर्ज करता येणार आहे.
संजय राऊत यांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीकडून संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणात चौकशीसाठी आणखी ईडीच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे कोर्टानं राऊत यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचं जेवण, औषधं घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलून घेण्यास सांगितलं आहे.