Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत (Dasara Melava) अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. तर दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीति आखल्याचेही बोलले जात आहे. यातच आता शिंदे गटाला बीकेसीवरील मैदान मेळाव्यासाठी मिळाले आहे. मात्र, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दसरा मेळाव्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला.
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. यातच आता संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना दसरा मेळाव्याबाबत आक्रमक होत महापालिका आणि शिंदे-भाजप सरकारला थेट इशारा दिला आहे.
परवानगी नाही दिली आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ
शिनसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करणे ही आमची परंपरा आहे. परवानगी नाही दिली आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेऊ, असा इशारा संजय राऊतांनी दिला. दुसरीकडे, शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावला आणि हे प्रकरण आणखी ताणले गेल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार, यावर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. या निर्णयाची वाट शिंदे गट आणि ठाकरे गट पाहत आहे. मात्र निर्णय घेण्याआधी विधी व न्याय विभागाचा सल्ला मुंबई महापालिका घेत असल्याची माहिती आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोघांचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आले आहेत. पहिला अर्ज शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याने शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे.