हमारी अफवाह के धुंए...; आशिष शेलारांसोबत भेट, संजय राऊतांचं ट्विट अन् राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:31 PM2021-07-04T12:31:27+5:302021-07-04T12:31:49+5:30
आशिल शेलार यांच्यासोबत कोणतीच भेट झाली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी आज केला आहे.
मुंबई: शिवसेनेने भाजपाशी असलेली युती मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची केलेल्या स्थापनेदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि सामनामधील अग्रलेखांमधून तसेच पत्रकार परिषदेमधून बोचरी टीका करत भाजपाला जेरीस आणणारे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली. मात्र आशिल शेलार यांच्यासोबत अशी कोणतीच भेट झाली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी आज केला आहे.
मुंबईतल्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना संजय राऊत आणि आशिष शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, संजय राऊत यांच्या गेल्या काही आठवड्यांमधील भेटींचा सिलसिला पाहताना या भेटीमुळे चर्चेलाही उधाण आलं आहे. या भेटीवर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र संजय राऊत यांनी भेटीवरुन सध्या रंगलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहे.
संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी कुणालाही भेटलो नाही, अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच ती झाली असली, तरी त्यात आश्चर्य काय? महाराष्ट्रातलं राजकारण हिंदुस्तान आणि पाकिस्तानसारखं नाही, की गोळ्या घाला आणि संपवा. ज्यांना माझ्यामुळे त्रास होता, ते अशा अफवा पसरवतात. मी त्यांचं स्वागतच करतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
माध्यमांसमोर येण्याआधी संजय राऊत यांनी एक ट्विट देखील केलं होतं. ''हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है'', असं सूचक विधान संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या या ट्विटची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
जय महाराष्ट्र pic.twitter.com/zysAyFakcb
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 4, 2021
दरम्यान, मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.
या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा त्यांनी केला आहे. या भेटीत काही राजकीय संदर्भ आहेत का याबाबत पक्षीय पातळीवर माझ्याकडे काही माहिती नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल- सुधीर मुनगंटीवार https://t.co/EavCej8Jjg
— Lokmat (@MiLOKMAT) July 4, 2021