मुंबई- मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजी निर्माण होईल आणि फुटलेल्या आमदारांना पश्चाताप होईल, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर टीका करत त्यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून थयथयाट सुरु आहे, असं म्हटलं आहे.
विनायक राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना विरोधात ज्या काही कार्यवाही झाल्या त्या जग जाहीर झाल्या आहेत, असं विनायक राऊत म्हणाले. तसेच दीपक केसरकरांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून थयथयाट सुरु आहे. उद्या जर शिंदे गटाने मंत्रिपद दिले नाही, तर टूनटूनत दुसऱ्या पक्षात जातील, असा टोला देखील विनायक राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की मारामाऱ्या होतील. या माऱ्यामाऱ्या वैचारिक असतील. आजकाल सगळे सत्तेचे भुकेले झालेले आहेत. त्यामुळेच हे ५० आमदार एकत्र आले आहेत. मुंबईत सुरू असलेलं यांचं शक्तीप्रदर्शन फक्त मंत्रिपदासाठीच आहे. आता ५० लोकांमध्ये १३ मंत्रिपदं दिली तर बाकिच्यांचं आहे. तिकडे भाजपाचे ११६ जण आहेत. मग ते काय महत्वाची खाती सोडणार आहेत का?, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला होता.
१४ खासदारांची शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी-
एकनाथ शिंदे यांनी बंड करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी शिवसेनेच्या ४० खासदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजीमाजी नगसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या लोकसभेतील खासादारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहे. आज शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याचे समोर येत आहे.