राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागलीय; त्यांना जागा दाखवून देऊ, विनायक राऊतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 05:16 PM2022-07-22T17:16:39+5:302022-07-22T17:17:00+5:30
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं गद्दाराची व्याख्या नाही का? गद्दार कोण आहे याचं उत्तर वरळीकर देतील, अशी टीका बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केली. आदित्य ठाकरे भाजप, शिवसेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंना हरविण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रयत्नही केला असल्याचा दावाही राहुल शेवाळे यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारांनी नाराजी व्यक्त करूनही काहीच झालं नाही. बहुतांश खासदारांना विनायक राऊत गटनेते म्हणून नको होते, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. विनायक राऊत आमच्यावर अन्याय करत होते, असा दावाही राहुल शेवाळे यांनी केला. तसेच विनायक राऊतांनी काहीही बोलू द्या, गटनेता मीच आहे, असंही राहुल शेवाळेंनी सांगितलं.
राहुल शेवाळेंच्या या विधानावर आता खासदार विनायक राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल शेवाळेंना आता अक्कलदाढ यायला लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळेंना त्यांची जागा दाखवून देऊ, असं आव्हान विनायक राऊतांनी दिलं आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांनी आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा मी आदर करतो, मात्र आपण वास्तववादी असले पाहिजे, असे त्यांना सांगितले होते. उद्धव हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा चेहरा असूच शकत नाहीत, असे सांगितल्याचे शेवाळे म्हणाले. अनेक मतदारसंघांत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी शिवसेनेने युती करणे, हा अत्यंत गुंतागुंतीचा मामला आहे, असं राहुल शेवाळे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा-
लोकसभा निवडणुकीत यूपीएचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणे हे आम्हाला कदापि मान्य होणारे नाही, असेही शेवाळे म्हणाले. शिवसेनेतील बहुसंख्य नेते भाजपशी युती करण्याच्या बाजूने आहेत आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, असेही राहुल शेवाळेंनी सांगितले.