'इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झालीय'; शिवसेनेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:58 AM2022-08-22T09:58:32+5:302022-08-22T10:00:01+5:30
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई- ईडीचा वापर करुन विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, असा विश्वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना नामशेष करण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला जातोय, अशा प्रकारची धरपकड कधीही झाली नाही. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्यासाठी ईडीचा पुरेपूर वापर केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आज तरी महाविकास आघाडी एकत्र आहे. मात्र पुढच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत लढण्याचे सध्या तरी ठरलेले नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अशाच पद्धतीने निर्णय होईल, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या काळू-बाळूचाच तमाशा सुरू आहे. एक दाढीवाला आणि दुसरा बिन दाढीवाला. बिन दाढीवाल्याच्या मनात आलं की खेचला माईक, मग दाढीवाला पडला उताणा. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. स्व. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कळश आणला. दिल्लीकरांशी भांडले. महाराष्ट्र चिरडण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरांनी कायम केला. २०२२ मध्ये मिळालेला मुख्यमंत्री जन गन मन सुरू असताना सारखा शर्ट खाली खेचत असतो, अशी टीकाही विनायत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.