मुंबई- महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना गडचिरोलीचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली असताना त्यांची सुरक्षा वाढवण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता, असा दावा करत शिंदे गटात दाखल झालेले आमदार सुहास कांदे यांनी केला होता. सुहास कांदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुहास कांदे यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी देखील भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: सांगावं की त्यांना सुरक्षा दिली की नाही. एकनाथ शिंदे यांना योग्य ती सुरक्षा देण्यात आली होती. त्यामुळे शंभूराजे देसाई आणि दीपक केसरकर यांनी पोपटपंची करु नये, असा टोलाही विनायक राऊतांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. तेव्हा नक्षलवाद्यांनी मारण्याची धमकी दिली. त्यांना मारण्यासाठी ते ठाण्यात आणि मुंबईत आले होते. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या जीवितास धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली.
हिंदुत्वविरोधकांना सुरक्षा दिली. मात्र हिंदुत्ववाद्यांना का सुरक्षा देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, असा फोन वर्षा बंगल्यावरून शंभूराजे देसाई यांना फोन करण्यात आला होता. एकनाथ शिंदेंना सुरक्षा का देण्यात आली नाही, असा प्रश्न मला पडला आहे, असे सुहास कांदे म्हणाले होते.
सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय-
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सुहास कांदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुहास कांदेंच्या पायाखालची वाळू सरकलीय, त्यामुळे ते आरोप करत आहेत. मातोश्रीवरून शंभुराजे देसाईंना फोन केल्याचा आरोप खोटा असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच झेड प्लस सुरक्षा हा विषय राज्य सरकारचा नसतो. सुरक्षेचा विषय हा केंद्राचा असतो आणि केंद्राने आता ती या लोकांना दिली आहे. शंभुराजे देसाईंकडे सिक्युरिटीचं कामच नाही. पण शंभुराजे आता त्यांच्या जवळचे आहेत त्यामुळे ते काहीही सांगत आहेत. अशा प्रकारचा आरोप करत आहेत, असं अंबादास दानवे म्हणाले.