खासदार राजेंद्र गावित यांच्या वाहनाने हरणाला उडविले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 01:23 AM2019-12-03T01:23:52+5:302019-12-03T01:24:40+5:30
ज्या चारचाकी वाहनाने हरणाला उडविले, ते वाहन शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे होते.
मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मादी हरणाचा वाहन अपघातात मृत्यू झाला. ज्या चारचाकी वाहनाने हरणाला उडविले, ते वाहन शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे होते. वनविभागाने ते ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू असल्याचे मुख्य वनसंरक्षक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक अन्वर अहमद यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी उद्यानातील त्रिमूर्ती स्टेशनजवळून खासदार गावित यांचे वाहन उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी जात होते. त्यावेळी हरणाच्या कळपातील एका हरणाला या वाहनाने धडक दिली. स्थानिकांनी हरणाचा अपघात होताना पाहिला व त्वरित याची माहिती मुख्य प्रवेशद्वाराजवळील वन अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर, वनविभागाने ते वाहन ताब्यात घेतले.
या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे म्हणाले की, वनक्षेत्रात वाहन चालविताना दक्षता घेण्याची गरज आहे. कारण वन्यप्राणी रस्ता कधीही ओलांडतात. खासकरून जे सरपटणारे प्राणी आहेत, त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. वनक्षेत्रात ताशी २० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवू नये. अपघातात मृत्यू झालेल्या हरणाचे शवविच्छेदन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
वाहनांवर बंदी का घातली जात नाही?
वन्य जिवांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवेशद्वारापाशी वाहनतळ उभारण्यात आले आहे. हे वाहनतळ दिवाळीनंतर सुरू करण्यात येईल, असे उद्यान प्रशासनाने सांगितले होते, परंतु वाहनतळाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी, वाहनांच्या भरधाव वेगामुळे वन्य जिवांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत एकूण आठ वन्य जिवांचा अपघाती मृत्यू झाला आहे. विदेशातील विविध राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांवर बंदी आहे, परंतु मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाहनांवर बंदी का नाही?
- विक्रम चोगले, सदस्य, रिव्हर मार्च
अपघाताचे मलाही दु:ख
आम्ही बुधवारी आदिवासी पाड्यांवर भेट देण्यासाठी गेलो होतो. दोघा तिघांना सोडण्यासाठी माझ्या गाडीचा चालक गाडी घेऊन जात असताना हरणाचा कळप तेथे होता. अचानक एक हरण बाहेर येऊन त्यापाठोपाठ एक पिल्लूही बाहेर आल्याने त्याचा अपघात झाला. मी त्यावेळी गाडीत नव्हतो. मीही प्राणीप्रेमी असून मलाही या अपघातामुळे दु:ख झाले आहे.
- राजेंद्र गावित, खासदार, शिवसेना, पालघर