स्थायीसाठी शिवसेना राष्ट्रवादी आमने-सामने
By admin | Published: April 16, 2015 10:49 PM2015-04-16T22:49:52+5:302015-04-16T22:49:52+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक उद्या शुक्रवारी होत आहे.
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक उद्या शुक्रवारी होत आहे. या निवडणूकीसाठी गुरूवारी शिवसेनेचे रमेश म्हात्रे तर राष्ट्रवादीच्या वतीने जव्वाद डोन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परिवहन सभापतीपदाच्या निवडणूकीत शिवसेनेला मित्रपक्ष भाजपाने धक्का देत राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे स्थायीमध्ये भाजप काय भुमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणूकीत भाजप आणि मनसे यांची मते निर्णायक ठरणार आहेत.
स्थायीत कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. परंतू विरोधी पक्ष असलेली मनसे गेली तीन वर्षे तटस्थ राहील्याने शिवसेनेला सभापतीपद उपभोगता आले. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरही सेना-मनसेतील संबंध ताणले गेल्याने मागील स्थायीची निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँगे्रसचे सदस्य यावेळी गैरहजर राहील्याने सेनेला सभापतीपद स्वत:कडे राखण्यात यश आले होते.
नुकत्याच झालेल्या परिवहन सभापतीपदाच्या निवडणूकीत भाजपा बरोबरच मनसेने राष्ट्रवादीला मतदान केले. त्यामुळे उद्याच्या स्थायीच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. परिवहन निवडणुकीत मिळालेला धडा पाहता स्थायीच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये या अनुषंगाने मंगळवारपासूनच सनेचे सदस्य अज्ञातवासात गेले आहेत. भाजप सदस्या अर्चना कोठावदे या देखील त्यांच्यासोबत असल्याची सूत्रांची माहीती आहे. या सर्वांना थेट निवडणूकीला आणले जाणार आहे.
रमेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर कल्याणी पाटील, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खा. डॉ श्रीकांत शिंदे, माजी महापौर रमेश जाधव आदी उपस्थित होते.
स्थायीत शिवसेना ७, भाजप १, मनसे ४, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी २ असे पक्षीय बलाबल आहे. उद्या सकाळी ११.३० वाजता निवडणूक होणार असून यावेळी पिठासिन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी या उपस्थित राहणार आहेत.