Join us  

शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये गृहखात्यावरून धुसफुस, मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 10:29 AM

गृहमंत्रिपद शिवसेनेला हवे असल्याची जोरदार चर्चा

मुंबई : राज्याच्या गृह खात्याच्या कारभाराबद्दल  शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळीच जाहीर नाराजी व्यक्त केल्याने या खात्याविषयी शिवसेना नाराज असल्याचे समोर आले. दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तासभर चर्चा केली. गृह खात्यावर मुख्यमंत्री नाराज नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला. मात्र, यानिमित्ताने गृह खात्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीतील धुसफुस समोर आली. 

राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते शिवसेनेला हवे आहे, अशीही चर्चा यानिमित्ताने झाली. भाजप-शिवसेनेचे सरकार असताना गृहखाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. तसेच ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असायला हवे, अशी भूमिका घेतली जात आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जाहीरपणे तशी मागणी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीतील नेत्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असताना राज्याचे गृहखाते मात्र भाजपच्या राज्यातील नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलत नाही, अशी शिवसेनेची नाराजी असल्याचे म्हटले जाते.

राऊतांकडून नाराजीला मोकळी वाटखा. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या नाराजीला वाट मोकळी करून दिली. ॲड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्याबद्दल प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, गृहखात्याने अधिक सक्षम झाले पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. 

आता गृहखात्यालाच दमदार पावले टाकावी लागतील. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा राऊत यांनी दिला. दुपारी पुन्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी, गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडे असण्याची परंपरा राहिली आहे, पण एका पक्षाच्या सरकारमध्ये ते शक्य असते असे वक्तव्य केले. 

राऊत यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे गृह खात्यावर नाराज असल्याची चर्चा रंगली. तथापि, मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्याचे खंडन केले. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यस्त असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून ट्विस्टशिवसेना-राष्ट्रवादीत गृह खात्यावरून धुसफुस समोर येताच माजी मंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘कहानी मे ट्विस्ट’ आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्रिपद व गृहमंत्रिपदाची शिवसेना-राष्ट्रवादीत अदलाबदल होऊ शकते, असे पिल्लू त्यांनी सोडले. तर, ‘वळसे हे लेचेपेचे आहेत, ते गृहमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडे असले पाहिजे. ते राष्ट्रवादीकडे राहिले तर उद्या कधीही मातोश्रीवर पोलिसांचे कॅमेरे लागू शकतील, असे मी म्हटले होेते अशी आठवण त्यांनी करून दिली. 

काय म्हणाले वळसे पाटील? गृहमंत्री वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी तासभर चर्चा केली. त्यानंतर  गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असावे या चंद्रकांत खैरे यांच्या वक्तव्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता वळसे-पाटील म्हणाले की, त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच विचारले तर बरे होईल.  मुख्यमंत्री गृहखात्याबाबत अजिबात नाराज नाहीत. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. आमच्या विभागाकडून कमतरता होत असेल तर सुधारणा होईल.

 

टॅग्स :शिवसेनाशरद पवारमुख्यमंत्रीराष्ट्रवादी काँग्रेस