शिवसेना-राष्ट्रवादीत तीन मुद्द्यांवरून तणाव; मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 06:28 AM2020-07-07T06:28:56+5:302020-07-07T06:29:13+5:30
बैठकीत काय घडले ही माहिती समोर आली नसली, तरी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातील मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात संध्याकाळी बैठका झाल्या.
बैठकीत काय घडले ही माहिती समोर आली नसली, तरी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी डीसीपी दर्जाच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. याची पूर्वकल्पना गृहमंत्र्यांना देण्यात आली होती असे पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून रविवारी स्पष्ट केले. आयएएस आणि आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने होतात. मुंबईत डीसीपी च्या बदल्या झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या मुखपत्रातून कळाली त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय नगर जिल्ह्यात पारनेरचे शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. त्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या नगरसेवकांना परत शिवसेनेत पाठवा अशा सूचना दिल्याचे वृत्त पसरले, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. तिसरा मुद्दा पारनेर पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि भाजपने सत्ता स्थापन केली, आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवले त्यावरून राष्ट्रवादीची नाराजी होती. यामुळे हे मुद्दे समोरासमोर बसून चर्चेतून सोडवण्यासाठी सगळ्या नेत्यांची बैठक झाल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
तसेच मंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, मंत्र्यांना काही अधिकारी बदलून हवे आहेत, त्या अधिकाºयांच्या तातडीने बदल्या करण्याचे विषय हळूहळू नाराजीचे बनू लागले आहे. त्याशिवाय मंत्र्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही, मंत्र्यांना काही अधिकारी बदलून हवे आहेत, त्या अधिकाºयांच्या तातडीने बदल्या करण्याचे विषय हळूहळू नाराजीचे बनू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक होत असून ते एकाच वेळी शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला आपण सरकार बनवू असे प्रस्ताव देत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे कमालीचे अस्वस्थ झाले असून त्यातून आलेली नाराजी त्यांनी शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली. त्यानंतर ही बैठक झाल्याचे वृत्त आहे.
शरद पवार यांनी या बेठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्पष्ट शब्दात सांगितले, की कोणत्याही प्रकारच्या बदल्या असल्या तरी त्या मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगूनच आणि त्यांच्या निदर्शनास आणूनच केल्या पाहिजेत. त्यावर देशमुख यांनी देखील त्यास होकार दिल्याचे कळते. शिवसेनेचे एक मंत्री म्हणाले, मुख्यमंत्रीच जर बदल्याविषयी अंधारात असतील तर हे योग्य नाही, त्यामुळे जे होऊन गेले त्यावर आता पडदा पडला आहे.