Join us

निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेला हवाय नरेंद्र मोदींचा आधार?; संजय राऊतांचा मोठा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:27 PM

शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, नवरात्री जशाप्रकारे दांडिया चालतो, काही ठिकाणी नॉन स्टॉप दांडिया चालतो.

मुंबई - नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे सर्वात मोठे नेते होते. त्यांच्या नावाचा फायदा भाजपाला झाला. बाळासाहेबांच्या नावावर भाजपा महाराष्ट्रात वाढली. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाही. आता मोदी सर्वात मोठे नेते आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींचा आधार घ्यावा लागतो तर भारतातही आधार घ्यायला हवा असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. 

एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राऊतांनी यावर भाष्य केलं आहे. तसेच शिवसेना-भाजपा यांच्यातील जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, नवरात्री जशाप्रकारे दांडिया चालतो, काही ठिकाणी नॉन स्टॉप दांडिया चालतो. त्यामध्ये कपल दांडिया खेळत असतं. चर्चेत कोण पहिलं थकतं हे पाहणं गरजेचे आहे. जागावाटप सोप्पं नसतं. यात मोठा भाऊ-छोटा भाऊ विषय नाही. लोकसभेत युती झाली तेव्हा अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 फॉर्म्युला निश्चित केला होता. मात्र निकालानंतर भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यामुळे शिवसेना सध्या निर्णायक परिस्थितीत आहे. महाराष्ट्रात मतांचे विभाजन होऊ नये ही दोन्ही पक्षांची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मराठीमध्ये एक म्हणं आहे धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय. सध्या देशात अशीच परिस्थिती आहे. भाजपासोबत आमचे इतक्या वर्षाचे संबंध आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं युती तुटू नये असं विधानही संजय राऊत यांनी मुलाखतीत केलं आहे. काही दिवसांपूर्वी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, जागावाटपात दिरंगाई होऊ नये असं वाटते, यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक खोळंबले असतात. मात्र 288  जागांचा निर्णय करताना सगळा विचार करावा लागतो असं ते म्हणाले त्याचसोबत 2014 साली शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत होते आपण सत्तेत गेलो पाहिजे पण माझं यावर मत वेगळं होतं. आम्ही सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं असा दावा संजय राऊतांनी केला होता.    

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदी