शिवसेनेला तीन मंत्रिपदांची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:11 AM2019-05-28T06:11:01+5:302019-05-28T06:11:12+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या केंद्र सरकारमध्ये किमान तीन मंत्रीपदे मिळावीत, अशी शिवसेनेची अपेक्षा असली तरी त्यांचे दोन मंत्रीपदांवर समाधान केले जावू शकते.
मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नव्या केंद्र सरकारमध्ये किमान तीन मंत्रीपदे मिळावीत, अशी शिवसेनेची अपेक्षा असली तरी त्यांचे दोन मंत्रीपदांवर समाधान केले जावू शकते. शिवसेनेतर्फे भावना गवळी, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रतापराव जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर बैठक घेऊन संभाव्य नावांबाबत चर्चा केली. शिवसेनेला मोदी मंत्रिमंडळात तीनचा कोटा मिळाला तर कोणाला संधी द्यायची आणि दोनच मंत्रीपदे मिळाली तर कोणाला संधी द्यायची या बाबत चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दोन मंत्रीपदे द्यायची तर ती कॅबिनेट द्यायला हवी आणि त्याला जोडून एक राज्यपालपद आम्हाला द्या, अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती आहे.
अनंत गिते, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढळराव पाटील आणि चंद्रकांत खैरे हे शिवसेनेकडून यावेळी मंत्रीपदाचे तगडे दावेदार होते. मात्र, चौघेही पराभूत झाले. त्यामुळे नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईतून मंत्रिपदाच्या शर्यतीत दोन जण आहेत. राज्यसभेचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती अनिल देसाई आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यापैकी एकाला संधी दिली जाईल. शिवसेनेला दोन मंत्रीपदे मिळाली तर एक मुंबईतील आणि मुंबईबाहेरील चेहरा दिला जाईल, असे मानले जाते. मुंबई बाहेरच्या नावांमध्ये यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा आजच्या बैठकीत झाली, असेही सूत्रांनी सांगितले.
>चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीला चार महिने बाकी असताना विस्तार करणे योग्य होईल का या बाबत पाटील यांनी ठाकरे यांची भूमिका समजून घेतली. ठाकरे यांनी विस्तारास शिवसेनेच्या वतीने हिरवा कंदील दाखविला. पुढील महिन्यात विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.पाटील यांना या बाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला. कोल्हापूरचा एक कलावंत पक्ष्यांच्या पिसांवर उत्तम चित्र काढतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्याने काढलेले चित्र भेट द्यायला मी गेलो होतो, असे पाटील यांनी लोकमतला सांगितले.