Join us

शिवसेना बिल्डरांची नव्हे भूमिपुत्रांची-उद्धव ठाकरे

By admin | Published: October 28, 2015 1:57 AM

‘२७ गावांमधील नागरिकांच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. तेथे केवळ बिल्डरांना आणून तेथील भूमिपुत्रांना बाजूला करायचे, असे शिवसैनिक होऊ देणार नाहीत.

डोंबिवली : ‘२७ गावांमधील नागरिकांच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. तेथे केवळ बिल्डरांना आणून तेथील भूमिपुत्रांना बाजूला करायचे, असे शिवसैनिक होऊ देणार नाहीत. कारण शिवसेनाही बिल्डरांची नसून भूमिपुत्रांची आहे,’ असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपाला लगावला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त फडके रोडच्या जाहीर सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना, आधी साबरमती आणि नंतर बारामती अशी भूमिका पंतप्रधानांनी घेतली होती. आता त्यांना १०० बारामती करायच्या आहेत. त्यामुळे केडीएमसीची बारामती करायची की, भगवा फडकावून शिवसेनेचा महापौर बसवायचा, याचा विचार करून १ नोव्हेंबरला कोजागिरी साजरी करा, असे आवाहन त्यांनी केले. मंगळवारी सकाळीच येथील एका नेत्याने ‘होम हवन’ केल्याचे समजले. श्रद्धा असणे ठीक आहे, पण सर्वसामान्यांना आवश्यक असणारे ‘होम’ तर आधी द्या, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. (प्रतिनिधी) पार्लमेंट ते पंचायत असा नारा जरी भाजपने दिलेला असला, तरीही खऱ्या अर्थाने त्यांची पंचाईत झाली आहे, अशी टीका त्यांनी केली. डाळींचे भाव वधारले आहेत, आत्महत्या होत आहेत, कधी महागाईमुळे तर कुठे गरिबीमुळे त्या होत आहेत. एका युवतीने महाविद्यालयात जाण्यासाठी बस प्रवासाला लागणाऱ्या पासाचे पैसे नाहीत, म्हणून आत्महत्या केली. याची दखल शिवसेनेने घेतली आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तातडीने आपण आजपासून मराठवाड्यातील युवक-युवतींना शिक्षणासाठी बसप्रवास मोफत करण्याचे आदेश दिले. त्याचा लाभ चार लाख ६० हजार विद्यार्थ्यांना होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ‘आम्ही आधी करतो मग सांगतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला.