उद्धव ठाकरेंना धक्का; दादरच्या बालेकिल्ल्यात ९ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 10:20 AM2022-07-12T10:20:08+5:302022-07-12T10:20:31+5:30

शेवटी आपल्या कष्टाचा काहीही उपयोग होणार नाही हे लक्षात घेऊन नाईलाजास्तव आम्ही या पदाचा त्याग करत आहे असं पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.

Shiv Sena office bearers from Dadar resign to Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना धक्का; दादरच्या बालेकिल्ल्यात ९ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उद्धव ठाकरेंना धक्का; दादरच्या बालेकिल्ल्यात ९ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Next

मुंबई - राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ४० आमदारांनी पक्षाच्याविरोधात भूमिका घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदाराचाही समावेश आहे. 

दादरच्या ज्या भागात शिवसेना भवन आहे. त्याठिकाणचे आमदार सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे गटात सहभाग घेतला आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातच शिवसेनेत फूट पडल्याचं दिसून आले. सदा सरवणकर गुवाहाटीत पोहचल्यानंतर शिवसैनिकांनी दादरमध्ये मोर्चा काढला होता. मात्र आता राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रामवस्था पाहायला मिळत आहे. यातच आमदार सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे. त्यांच्यासोबत शाखाप्रमुख, उपविभाग संघटक यांच्यासह ९ प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. 

सदा सरवणकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून म्हटलंय की, २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा युतीमध्ये निवडणुका लढवल्या. शिवसेना-भाजपा युतीमध्ये जनता जनादर्नाचा कौल मागितला. तसा तो मिळालाही. परंतु आपण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळाले त्याचा आम्हाला आनंद आहे. शिवसैनिकांसह जनसामान्याची गेली अनेक वर्ष रखडलेली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. परंतु सत्ता मिळूनही शिवसैनिक म्हणून मी कार्यरत असलेल्या विभागातील कोणतेही विकासाभिमुख काम होऊ शकले नाही हे खेदाने म्हणावे लागत आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सरकार असूनही शिवसैनिकांच्या कामाची कदर वा भले झाले नाही. तशी आमची अपेक्षा ती काय मोठी होती. आपले शासन म्हणून ती कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. जे झाले नाही. शेवटी आपल्या कष्टाचा काहीही उपयोग होणार नाही हे लक्षात घेऊन नाईलाजास्तव आम्ही या पदाचा त्याग करत आहे. या जबाबदारीतून मला मुक्त करावे ही विनंती, तथापी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे दैवत अखंड राहील असं या पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. 

राजीनामा दिलेले पदाधिकारी
आ. सदा सरवणकर - विभागप्रमुख
संदीप देवळेकर - शाखाप्रमुख
संतोष तेलवणे - शाखाप्रमुख
अजय कुसूम - शाखा समन्वयक
कुणाल वाडेकर - उपविभाग समन्वयक
मिलिंद तांडेल - शाखाप्रमुख
अरुंधती चारी - महिला शाखासंघटक
शर्मिला नाईक - महिला उपविभाग समन्वयक
मंदा भाटकर - शाखा संघटक 

Read in English

Web Title: Shiv Sena office bearers from Dadar resign to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.