Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. यातच शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी, हजारो शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निकटवर्तीयाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचे खंदे समर्थक विश्वनाथ राजपूत आणि ठाकरे गटातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी गळाला लावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेसह मनसे पदाधिकारीही शिंदे गटात सामील
शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी अंबादास दानवे यांच्या विश्वासातील मानल्या जाणाऱ्या विश्वनाथ राजपूत यांना गळाला लावत शिंदे गटात सामील केले आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या तोंडावर जैस्वाल यांनी खेळलेली खेळी महत्त्वाची मानली जात आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या कार्यक्रमाला दांडी मारणारे मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसह जैस्वाल यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान, विश्वनाथ राजपूत हे जुने शिवसैनिक आहेत. त्यांची पत्नी प्राजक्ता राजपूत या माजी नगरसेविका आहेत. २०१० च्या मनपा निवडणुकीत त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्या होत्या. आताच्या घडीला त्या महिला आघाडीच्या शहर संघटक या पदावर कार्यरत आहेत. राजपूत यांच्या वॉर्डात आमदार मनीषा कायंदे यांच्या निधीतून अनेक विकासकामे झाली आहेत. या विकासकामांसाठी दानवे यांनी पुढाकार घेतला होता, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"