Join us

मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय

By मनोहर कुंभेजकर | Published: February 16, 2023 5:15 PM

शिवसेनेत संघटनात्मक बदल्यांचे सत्र (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सुरू झाले आहे. मुंबई शहर,पश्चिम व पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांच्या बदल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. 

मुंबई-शिवसेनेत संघटनात्मक बदल्यांचे सत्र (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सुरू झाले आहे. मुंबई शहर,पश्चिम व पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांच्या बदल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. आता शिंदे गटाच्या आव्हानानंतर मुंबईतील विभागप्रमुख बदलून त्याजागी नवीन रक्ताला वाव देण्याचे नेतृत्वाने ठरवलेले दिसते. तसेच ज्या विभागप्रमुखांच्या बदल्या केल्या त्या इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना नेत्यांनंतर मुंबईतील महत्वाचे पद कुठले असेल ते मुंबईतील विभागप्रमुख हे पद आहे. शिवसेनेच्या शाखांमधील शिस्तबद्ध बांधणी व पक्षकार्याची आखणी करण्याचे काम हे विभागप्रमुख जोमाने करित असत. लोकसभा, विधानसभा या निवडणूकीतील प्रचाराची धुरा बहुतांशी हे विभागप्रमुखच सांभाळत होते. 

शिवसेनेचे विभागप्रमुख म्हणून ज्यांनी शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात व १९८०च्या सुरवातीला ज्यांनी काम केले असे दिवाकर रावते हे शिवसेनेत नेते पदावर गेले तसेच १९९५च्या व २०१९ च्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पद देखील भूषवले त्यांच्या विभागप्रमुखपदाच्या काळात शिवसेनाभवन उभे राहिले, तसेच त्या काळातील काही विभागप्रमुखांची नावे घ्यायची झाली तर गजानन वर्तक, रमेश शेट्ये, दादा वेदपाठक, रविंद्र मिर्लेकर, शिशिर शिंदे, सुभाष पारकर अशी नावे घ्यावी लागतील. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात ६ ते ७ विभागप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कार्यरत होते. 

आता या १०-१२ वर्षाच्या काळात जास्तीत शिवसैनिकांना संघी मिळावी यासाठी ६ लोकसभा व ३६ विधानसभा मतदारसंघात १२ विभागप्रमुख पद निर्माण करण्यात आले.  प्रत्येक विभागप्रमुखाला ३ विधानसभेचे मतदारसंघ येतील अशी वाटणी झाली. 

विभाग क्र १ मधील विलास पोतनीस यांच्या जागी तरूण रक्ताचे उदेश पाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोतनीस हे विधानपरिषदेचे आमदार असून आता त्यांना लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष पद दिले आहे. विभाग क्र २ मध्ये सुधाकर सुर्वे यांच्या जागी अजित भंडारी, विभाग क्र १० मध्ये सदा सरवणकर शिंदे गटात गेल्यावर त्याजागी त्यांचे कट्टर विरोधक महेश सावंत ( यानी तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांच्या तोंडाला फेस आणला होता) विभाग क्र १२ मध्ये जुने जाणते पांडुरंग सपकाळ यांच्या जागी संतोष शिंदे, पूर्व उपनगरात घाटकोपर साईडला राजेंद्र राऊत यांना बदलून तुकाराम पाटील, मंगेश सातमकर सारख्या विभागप्रमुखाला बदलून तिथे प्रमोद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. 

जुन्या विभागप्रमुखांपैकी अँड. अनिल परब हे २२ वर्षे विभाग क्र ४ व ५ आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघ अश्या ७ विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणून काम पहात आहेत. आजही त्यांची जागा घेऊ शकेल असा विभागप्रमुख पक्ष प्रमुखांना मिळत नाही एव्हढी जबरदस्त पकड परब यांनी या विभागावर मिळवली आहे. 

मुळात विभागप्रमुख बदलाची हि खेळी केवळ पक्षातील केवळ भाकरी फिरवण्याचा प्रकार आहे कि दुसरे काही हे येत्या काळातच कळेल अशी कुजबूज शिवसैनिकांमध्ये आहे.

टॅग्स :शिवसेनामुंबईउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे