Join us

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:17 AM

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर कायदेशीर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे.

मुंबई-

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर कायदेशीर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. आज सकाळी शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदेंच्या गटाचे प्रतोद भरत गोगावले काही सहकारी आमदारांसोबत आज विधीमंडळात आले आणि त्यांनी विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं. 

विधीमंडळात प्रत्येक राजकीय पक्षासाठी एक कार्यालय ठरवून दिलेलं आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट अशी फूट पडलेली असताना विधीमंडळात गेल्या अधिवेशनात शिंदे गटासाठी वेगळी व्यवस्था केली गेली होती. पण आता निवडणूक आयोगानं शिंदे गटच शिवसेना असल्याचं जाहीर केल्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी आज विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतलं आहे. शिंदे गटानं कार्यालय ताब्यात घेतलेलं असताना ठाकरे गटाचे आमदार आता विधीमंडळात कुठे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

नियमात बसणाऱ्या सगळ्या गोष्टी करू- भरत गोगावलेविधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आम्ही कायदेशीररित्या पक्ष कार्यालयात प्रवेश केला आहे, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले. तसंच याचप्रमाणे शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना भवनही ताब्यात घेतलं जाणार का? असं विचारलं असता भरत गोगावले यांनी नियमात बसणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करू, अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदे