मुंबई : महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे केंद्राच्या सत्तेचा माज चालणार नाही, विधान परिषदेत आम्हीच जिंकणार. शेराला सव्वाशेर भेटतोच या शब्दांत भाजपला सुनावत राज्यसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत काढण्याचा निर्धार मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ठाकरे यांनी सध्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन केले.उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखविणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचे आहे, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना केले. उद्याची निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ठाकरे म्हणाले की, उद्या आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही. आता शिवसेनेत गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपकडे; पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मी मुख्यमंत्री असलो नसलो तरी काहीही फरक पडत नाही; पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यावर समोरचा माणूस आदराने उभा राहतो, हे कोणीही काढून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना मी विधानपरिषदेची उमेदवारी दिली नाही; पण कोणतीही धुसफूस न करता ते निष्ठेने याठिकाणी आले आहेत, असे कौतुक ठाकरे यांनी केले.
‘मला आईचं दूध विकणारा नराधम नको...’राज्यसभेच्या निवडणुकीत आपले एकही मत फुटलेले नाही. मग फुटले कोणते तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो; पण कितीही फाटले तरी शिवसेना अजून मजबुतीने उभी राहिली आहे. मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको आहे, हे शिवसेनाप्रमुखांचे विधान आजही सर्वांच्या लक्षात आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख