स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपद शिवसेनेकडे
By admin | Published: April 6, 2016 05:06 AM2016-04-06T05:06:38+5:302016-04-06T05:06:38+5:30
शिवसेनेने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी स्वतंत्र अर्ज भरल्यामुळे शिक्षण व स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़
मुंबई : शिवसेनेने प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी स्वतंत्र अर्ज भरल्यामुळे शिक्षण व स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर भाजपाने नांगी टाकत शिवसेनेच्या पारड्यात मत टाकले़ त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशोधर फणसे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी हेमांगी वरळीकर निवडून आले.
महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपाची तयारी सुरू आहे़ त्याच वेळी शिवसेनेने प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करून मित्रपक्षालाच आव्हान दिले आहे़ त्यामुळे भाजपाने शिवसेनेविरोधात दंड थोपटले होते़ याचा फटका आज होणाऱ्या स्थायी व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता व्यक्त होत होती़
मात्र भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात सोमवारी वाटाघाटी झाल्या़ त्यानुसार भाजपाने आज माघार घेत स्थायी व शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले़ या निवडणुकांमध्ये मनसे सदस्य गैरहजर व समाजवादी तटस्थ राहिल्यामुळे युतीचा उमेदवार विजयी झाला़
शिक्षण समितीवरही धनुष्यबाण
भाजपाकडे असलेली शिक्षण समिती शिवसेनेने या वर्षी आपल्याकडे खेचून आणली आहे़ तर सुधार आणि बेस्ट समितीवर भाजपाची बोळवण करण्यात आली आहे़ शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमांगी वरळीकर यांना १५ मते मिळाली़ तर काँग्रेसच्या उमेदवार प्रियतमा सावंत यांना ७ मते मिळाली़ या वेळी मनसेचे ३ व राष्ट्रवादीचा १ सदस्य गैरहजर आणि समाजवादी पक्ष तटस्थ राहिला़ (प्रतिनिधी)