Join us

प्रशांत परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, शिवसेना आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 1:02 PM

विधान परिषदेतील भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले.

मुंबई -  विधान परिषदेतील भाजपा पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. शिवाय, परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत सभात्याग केला. सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन बुधवारी (28 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले. यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे.  

विधानसभेचे कामकाज मंगळवारी (6 फेब्रुवारी) सुरू झाल्यानंतर प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली. परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारे असून या वक्तव्याबाबत कठोरातील कठोर शिक्षा द्यायला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी केली. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन प्रशांत परिचारक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण सुरू झाले.

अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रशांत परिचारक हे वरच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येत नसल्याची बाब शिवसेनेच्या सदस्यांच्या नजरेस आणून दिली. मात्र तरीही शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका न सोडल्याने अखेर विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिचारक यांच्याबाबत सभागृहाच्या भावना तीव्र असून याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत याप्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याची भूमिका मांडली.

''विधानसभेप्रमाणे विधान परिषदेचे सभागृहही स्वायत्त आहे. तेथे या विषयावर चर्चा करण्यात येत असून याबाबत निर्णय होईल. त्यामुळे आपल्याला त्यांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करता येणार नसल्याचे सांगत प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत'', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर सुनिल प्रभू यांनी परिचारक यांच्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत सर्व शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. 

- प्रशांत परिचारक यांचे वादग्रस्त विधान‘सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. शिवाय, विधान परिषदेतून दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

टॅग्स :भाजपाप्रशांत परिचारक