Join us

अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 8:18 PM

भरमसाठ वीजबिलवाढीचा शिवसेनेकडून निषेध

मुंबई--उपनगरातील लाखो वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठवणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. वाढीव वीज बिलाबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना विभाग क्रमांक 4 आणि 5 च्या वतीने विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरदेखील मोर्चात सहभागी झाले होते.आज दुपारी 2 वाजता शिवसैनिक शाखा क्रमांक 93 वांद्रे (पूर्व) चेतना महाविद्यालयाजवळ जमले होते. त्यानंतर हा मोर्चा अदानी इलेक्ट्रिसिटी (रिलायन्स एनर्जी) कार्यालयावर नेण्यात आला होता. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. अदानी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ कपील मिश्रा यांच्याबरोबर आमदार परब यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाची वाढीव बिलाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यांनी चूक मान्य करून पुढील बिलात याची जातीने दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार अनिल परब यांनी दिली. यावेळी आपल्या भाषणात आमदार अॅड. अनिल परब यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीला इशारा देताना सांगितले की, जर अदानीने पश्चिम उपनगरातील वीज ग्राहकांच्या बिलात 25 टक्के रक्कम कमी न केल्यास शिवसेना तीव्र आंदोलन करेल. आज फक्त विभाग क्रमांक 4 व 5 च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पुढच्या वेळेस मुंबईतील सर्व 227 शिवसेना शाखा मोर्चात उतरतील आणि मग अदानीला बोजा बिस्तारा बांधून गुजरातला पाठवण्यात येईल असे आमदार परब यांनी ठणकावून सांगितले. 

टॅग्स :वीजशिवसेना